AJ
ka ca sodha (why?)
ka ca sodha (why?)
Couldn't load pickup availability
आजी गेली . आयुष्यभर तिने आम्हा नातवंडांवर खूप माया केली . आयुष्यभर ती अत्यंत साधेपणाने जगली . सदैव “तू ” चाच विचार तिने केला. “मी माझे” विचार तिला शिवताना कधी दिसला नाही. एकदा ICU मध्ये तिला भेटायला गेलो तेंव्हा म्हणाली “तू जेवलास का ?” या तिच्या तीन शब्दातच डोळे पाणावले . तिचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून गेला .साधे , निःस्वार्थी , इतरांसाठी वाहिलेले जीवन.
पुढे तिच्या अंत्य संस्कारांच्या वेळी मनात काहूर उठले. स्वतःच्या विषयी , स्वतःच्या जीवनसरणी विषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. जीवनाने ओसंडून वाहणारी आजी आज शांत होती . माझे पुढे काय होणार ते भीषण सत्य ती निपचित राहून सांगत होती . नेहेमी माझ्यावर माया करणारी आज मला प्रचंड अस्वस्थ करत होती.
आणि मी करंटा, नेहेमी स्वार्थी विचार करणारा , आज सुद्धा स्वतःच्याच विवंचनेत .
हे कुठेतरी बदलायला हवे . जीवन न संपणाऱ्या अपेक्षांची यादी न राहता , आजी सारखी खळाळत वाहणारी नदी असायला हवे . सतत मी माझे ची विवंचना न राहता आनंद ,समाधानाची मालिका असायला हवे. “माझे कसे होईल?” पेक्षा “सर्व मंगल” चा जप असायला हवे. त्या साठी जीवनाची रहस्ये शोधायला हवीत.“का चा शोध?”घ्यायला हवा. अंतर्मुख व्हायला हवे .
आणि जेव्हा स्वतःच्या अस्तित्वात पाहायला सुरवात केली तेंव्हा हळूहळू लक्षात येवू लागेले की या साडे पाच फुट देहा मागे “मन ” नावाचा विस्वीर्ण समुद्र आहे. आणि त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत जी आपले बाह्य जीवन घडवत असतात . खरे जीवन तर आत मनातच असते . जे बाहेर दिसते ते फक्त प्रतिबिंब असते.
इथे हे ११ लेख प्रस्तुत करत आहे. जे अत्यंत साध्या शब्दात मनाच्या खोल समुद्रात शिरून “का चा शोध ” घेण्याचा प्रयत्न करतील . हे विचार पटतीलच , आवडतीलच असे नाही . पण एक गोष्ट निश्चितच सांगता येईल , की मनात खोल वर दडलेली काही गुपिते समोर येवून उभी राहतील . आज आणि आत्ता .
Share
